आइसस्क्रीमची संध्याकाळ
...
आइसस्क्रीम… शब्दासोबत जाणवतो घशाला थंडगार स्पर्श..
जीभेवर विरघळणारी सुंदरशी चव.. कोन, डिश, बाउल काही असो.. भर उन्हाळ्यात आइसस्क्रीम
खाणं ही चैनीची परिसीमा असते.. मुळात या शब्दाची आठवणच उन्हाळ्याची काहिली कमी करते.
लहानपणी तर आइसस्क्रीम खाण्याची क्रेझ होती. कारण एरवी वर्षभर आइसस्क्रीम मिळणार नाही
अशी सक्त ताकीद असायची आणि ती पाळलीही जायची. वैशाली, राजा, समाधान, विहार, चंदा या
रत्नागिरीतल्या सुप्रसिद्ध आइसस्क्रीम सेंटरकडे पाहत वर्षभर मी मे महिन्याची वाट पाहायचे.
वर्षभर ही दुकानं बंद असतात असं समजून स्वतःलाच समजवण्याची सवय आम्ही भावंडांनी लावून
घेतली होती. आइसस्क्रीम फक्त मे महिना या अटीवर आईबाबा फारच ठाण होते. कोणताही हट्ट चालतच नसे. रडा, ओरडा किंवा त्रागा करा, नाही म्हणजे
नाही.
ही सक्तीची बंदी उठायची परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी. संध्याकाळी
आमच्या स्वाऱ्या आम्ही म्हणू त्या ठिकाणी आइसस्क्रीम खाण्यासाठी जायच्या. मग रोजचा
रतीब सुरू. सुट्टीच्या सुरुवातीली अगदी काही दिवस अगदी अधाशासारखे ज्युस, फालुदा, आइसस्क्रीम
यातलं काही ना काही खाल्लं जात असे. पण आठवड्याच्या आतच आमचा आइसस्क्रीम खाण्यातला
उत्साह संपायचा आणि मग एका दुपारी कपड्यांची पिशवी भरून कासारवेलीत मुक्कामी जाणं व्हायचं.
मे महिन्याची सुट्टी खऱ्या अर्थानं इथून सुरू व्हायची. तापत्या उन्हात सुरू असायची
मांडवातल्या कामांची लगबग, संध्याकाळी लपाछपी, डब्बा ऐसपैस, लगोरी, आंधळी कोशिंबीर
अशा कोणत्याही खेळातली अटीतटीची राज्य, एकमेकांना रडवणं, चिडवणं, रात्र रात्र चालणारे
पत्त्यांचे डाव, त्यात एखाद्याला रडवणं, अंगणात आजी जाईपर्यंत झोपल्याचं सोंग करून
पडून राहणं आणि ती गेली की मग उठून पुन्हा गप्पा मारणं, रात्री उशिराची ड्युटी संपवून
मामा आल्यावर चढाओढीनं आंबे खाणं, पायरीचा वरपीक आंबा पडल्यावर तो उचलायला धावत जाणं..
मांडवात बसून मारलेल्या गप्पा, उरापोटी केलेली आंब्याची उस्तवार, पेट्यांना खिळ्या
ठोकणे, पेंढा भरणे, भरलेल्या पेट्या आत ठेवणे, कंबरभर आंब्याची रास दिवसभरात संपवणं
या अशा एक ना अनेक गोष्टीत मे महिना सरत यायचा. वळवाचा एखादा पाऊस बरसून गेला, की पावसाच्या
आधीचं तापतं ऊन जीवाची घालमेल करायला लागायचा आणि त्या नेमक्या वेळेला मामा आइसस्क्रीम
तयार करायच्या गोष्टी सुरू करायचा. कधी करायचं, कसं करायचं, रस किती लागेल, बर्फ कोण
आणणार… मनात आइसस्क्रीम
फिरायला लागायचं. डिश भरलेली समोर यायची.. झोपाळ्यावर फक्त आणि फक्त आइसस्क्रीम करण्याच्या
दिवसाची चर्चा व्हायला लागायची. होता होता आइसस्क्रीम करण्याचा दिवस यायचा. घरातल्या
सगळ्यात मोठ्यांपासून ते दारातल्या गडी माणसांपर्यंत सगळ्यांना आइसस्क्रीम दिसत असायचं.
कोणी विकत घेऊन खाणारं नव्हतंच त्यांच्यापैकी. त्यांच्या दृष्टीने असं भरपेट आइसस्क्रीम खाणं ही पर्वणीच असायची. आइसस्क्रीमचा
फ्लेवर अर्थातच मँगो..!
सकाळीच आमोददादा आणि बरोबर आमच्यापैकी कोणी तरी एक जाऊन बर्फाचा मोठा
खडा विकत घेऊन यायचं. दुपारपर्यंत लीलामावशी आमरसाची मोठ्ठी पातेली भरून ठेवायची. मग
सुरू व्हायचा आइसस्क्रीम पॉट फिरवण्याचा कार्यक्रम. लाकडी पॉट, त्याच्या भोवती घातलेला
बर्फ, आतला रस, साखर असं सगळं मिश्रण ढवळणं सुरू व्हायचं. लाकडी पॉटचं हँडल फिरवून
मामा दमला की आमोददादा, तो दमला की धनू, मग मी … एका पाठोपाठ एकेक.
हँडल फिरवताना दमणूक व्हायची. हळूहळू हँडल अधिक जड व्हायला लागायाचं. त्यातलं आइसस्क्रीम
तयार होतं आहे, ही जाणीव व्हायची. पुढच्याच क्षणी आइसस्क्रीम पॉट उघडला जायचा आणि समोरच्या
डिशमध्ये वाढलं जायचं आणि न सांगता आमच्यापैकी कोणी तरी ते आइसस्क्रीम देवासमोर नेऊन
ठेवायचं.. मग दुसरी डिश तात्यांना आणि मग तिसऱ्या डिशसाठी नुसती झुंबड..! वाट्या, डिश
ते फुलपात्रापर्यंत असं काहीही ज्यानं त्यानं घेतलेलं असायचं. त्यात हवं तितकं आइसस्क्रीम..
कितीही वेळा.. त्या संध्याकाळचा मेन्यू फक्त आइसस्क्रीम असायचा. दारातल्या पैरी (कामाला
येणाऱ्या बायका), गडी माणसं प्रत्येकाला आग्रहानं खाऊ घातलं जायचं. ‘अरे घे रे अजून
एकदा..,’ ‘बायो तू खाल्लंस का, दमलीस हो महिनाभर,’ ‘आधी या तेजूला खायला द्या, सारखं
मला मला करते आहे,’ ‘ए खा रे अजून, दोन वाट्यांमध्ये दमत्येस काय?’ ‘अरे तो बघ डिश
धुवायला गेला, पकडा आणि द्या अजून,’ अशा वाक्यांची फेकाफेक करत आइसस्क्रीम खाल्लं,
आणि आग्रह करकरून वाढलं जायचं.. पहिल्या घासासोबत मनावर एक तृप्तीची रेघ उमटत जायची.
अंगणातल्या मांडवात आणि समोरच असलेल्या ओटीवरच्या झोपाळ्यावर बसून मनसोक्त आइसस्क्रीम
खाण्यात दंग झालेली आम्ही पंचवीस-तीस माणसं इतकंच उरायचं.. ओसरत्या उन्हात महिनाभराच्या
श्रमानं दमलेली मंडळी चवीचवीनं आइसस्क्रीम खातायत, तृप्तीची हलकीच लहर प्रत्येक घासासोबत
त्यांच्या चेहऱ्यावर दिसतेय..यापेक्षा दुसरा आनंदच नाही असं वाटून डोळ्यावर एक समाधानाची
गुंगी यायची… त्या सगळ्या गडी आणि पैऱ्यां तो क्षण जगत असायच्या,
एखाद्या रुपया मिळणारं आइसफ्रुट क्वचित कधी तरी विकत घेऊन खाणारी ही माणसं; मिळालेल्या
अल्प पैशांत संसाराचा गाडा हाकताना दमून गेलेली असायची..शिक्षण नाही, हाती कौशल्य नाही,
मुबलक पैसा नाही अशा स्थितीत परिस्थितीनं गांजलेल्या या माणसांना या आइसस्क्रीमच खातानाच्या
क्षणी त्यांच्या साऱ्या चिंतांचा विसर पडलेला असायचा. त्यांच्या लेखी तो दिवस सर्वांत
मज्जेचा आणि आनंदाचा असायचा. त्यांच्या साऱ्या चिंता, व्यापताप सगळं काही मागे पडलेलं
असायचं. ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं, पुन्हा पुन्हा आइसस्क्रीम खाताना त्यांना
मजा वाटायची. ते सारं पाहताना आमच्याच डोळ्यांवर आनंदाची एक गुंगी यायची आणि आइसस्क्रीमच्या
पहिल्या घासासोबतच पोट भरून जायचं.. वाटायचं किती छोट्या गोष्टीतला आनंद जगलो आपण..संपत
आलेल्या मे महिन्यातल्या उतरत्या उन्हातली ती संध्याकाळ सुंदर सोनेरी खरं तर मँगो आइसस्क्रीमच्या
पिवळसर रंगात वितळून जायची.. आणि मग आइसक्रीमच्या चवीपेक्षा त्या एकत्र खाण्यातल्या
आनंदासह मनात रुतून राहायची..
Good One
ReplyDeleteखूप छान. ..
ReplyDeleteNice article.
ReplyDeleteअस्मिता मस्तच. खूप छान लिहितेस तू. नियमितपणे ब्लॉगिंग कर.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteतोंडात पाणी आणि मनात आठवणींचा दरवळ!
ReplyDeleteमस्त मस्त :D
awwww thats super nice!!!!!!!!!!!
ReplyDeleteवाह मस्त ! अगदी डोळ्यासमोर सगळं उभं राहिलं !
ReplyDelete